Tuesday, December 15, 2015

सहकारी

माझा असा समाज होता की माझ्या सगळ्या सहकार्याचं आयुष्य आणि अनुभव साधारणपणे माझ्याच सारखे असावेत. पण ते काही खरं नाही, तो मोठा गैरसमज होता. अगोदरच्या नोकरीत माझ्या शेजारी बसून काम करणारा पूर्वी चौकात चादर टाकून ट्यारो कार्ड वाचायचा. आणि आता प्रोग्रामिंग करतो. एक जण एक्सीडेंट मध्ये गेलेले व्यक्तींचे प्रेत मॉर्ग मध्ये टाकण्यापूर्वी धुवून काढायची नोकरी करायचा. पण सगळ्यात भयंकर म्हणजे एक सहकारी बाई बर्लिन जवळ पूर्व जर्मनीत एका खेडेगावात शेतात काम करत होती. त्या खेड्यात जेमतेम ३०० जण. त्या सगळ्यांनाच त्यांच्या जगण्याचा वीट आला होता अन त्यांना भुयारातून पश्चिम जर्मनीत पळून जायचं होतं. पण तसं बोलायचीही चोरी होती. कारण त्यातले खूप जण सरकारी खबरी होते. त्यामुळे असं पळून जायचा मनसुबा बोलुन दाखवणारे रातोरात पकडले जायचे अन पुढे त्यांची कधीच काही खबर यायची नाही. पोलिसांना खबर देणारे कोण हे कळायचं नाही पण तिच्या मते कुणाचा भाऊ अन काका वरही विश्वास ठेवता यायचा नाही. या मानानी माझं आयुष्य अगदी सरळ सुतासारखंच समजायचं.

आप्तेष्टाच्या भल्यापेक्षा कुणाला देशाची जुलमी राजवट टिकवण महत्वाचं वाटाव हे खूपच दुर्दैवी आहे.  एका दृष्टीनी आपल्याला काय महत्वाचे आहे हे ठरवण किंवा शोधून काढण फार चांगले आहे. मला फेमिली सगळ्यात जास्त महत्वाची वाटते. कुणाला देश महत्वाचा वाटत असेल, कुणाला समाज, कुणाला विज्ञान, कुणाला त्यांचा धर्म अन कुणाला आणखीन काही. त्यात चूक किंवा बरोबर असं काही नसावं, ते ज्यांचे त्यांनी ठरवावे. फक्त एकदा ते उमगलं कि त्या मागे स्वताला झोकून देता यायला हवं. सोयीप्रमाणे ते रोजच्यारोज बदलायला नको, अन त्यात ढोंगीपणा असू नये कारण त्यात बरोबर किंवा श्रेष्ठ किवा चूक असं काही नाही.  एकदा स्वतःपेक्षा आपण कशाला महत्व देतो हे कळलं कि जगण्याला एक दिशा मिळते अन दैनंदिन जीवनात कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायला हवं अन कुठल्या गौण ते सहज ठरवता येतं.

मला फेमिली / कुटुंब सर्वात महत्वाचं वाटतं अन आपल्या संस्कृतीत तसे काही उदाहरणं आढळतात पण नेहेमीच तसं  घडलं असं नाही. पुंडलिकांनी विठ्ठलाला विटेवर उभा केला म्हणजे देवापेक्षा त्याला वडील महत्वाचे, अन ते विठ्ठलालाहि आवडलं. भगवान श्रीराम स्वतःच्या वडिलांचे वचन पाळण्याकरता वनवासात गेले, त्यांना ते इतर सर्वापेक्षा जास्त महत्वाचे होते. आताच्या काळात बऱ्याच देशात कुणाला स्वतःच्या नवरा वा बायको विरुद्ध साक्ष देण्यास भाग पडू नये असा कायदा आहे. पण कायदा किंवा समाज काय म्हणतो त्यापेक्षा स्वतःला काय पटत ते महत्त्वाच आहे. शिवाय हिंदू तत्वज्ञान  इतर धर्मापेक्षा  उदार मतवादी असल्यामुळे त्यात कुठले कडक नैतिक नियम-निर्बन्ध नाहीत; ज्याचा मार्ग त्यांनी निवडावा अन त्याप्रमाणे करावं ते भरावं हे खूप चांगलं तत्व आहे.

Monday, December 7, 2015

नोकरीचा पहिला दिवस

आज नवीन जॉब चा पहिला दिवस. बिलिंग आणि पेयमेंट करता एक नवीन सिस्टम तयार करायची त्याचं प्रोजेक्टच काम  मला बघायचं आहे. फारसं काही झालं नाही. खुप गोष्टी वाचायला दिल्या ते झाल्यावर माझी इतरांशी ओळख करून देतील. सध्या वाचतोय ते इंटरेस्टिंग आहे. मला वाटलं बहुतांश पेयमेंटस क्रेडीट कार्ड वर होत असतील पण तस नाही, जेमतेम १४% क्रेडीट कार्ड वर  असतात. ५६% चेक, ACH अन डेबिट कार्ड वर अन २९% नगद असतात. वायर ट्रान्स्फर तर जेमतेम ०.१%, पण त्याचा एवेरेज ट्रान्साकशन असतं २८ करोड रुपये!

पूर्वीचं ऑफिस म्हणजे खूप दाटीवाटीचं  कॉनक्रीट जंगल  होतं त्यामानानी ही  बिल्डिंग छान ऐसपैस आहे. समोर मोठे कारंजे अन बसायला खुर्च्या अन बेंच वगैरे. आत पण माझ्या मागे भिन्तेएवजी मोठी काचेचीच भिंत आहे म्हणुन खूप प्रसन्न वाटतं. मात्र कॉन्फेरेंस रूम मध्ये खुर्च्या कमी असतील म्हणून सतत कुणी न कुणी येवुन  खुर्च्या पळवत होते. उद्या जाईन तेव्हा माझी खुर्ची जागेवर असेल का कोण जाणे. सायकल सारखं खुर्चीला पण टेबल बरोबर लॉक करावं लागेल.

कॉन्फेरेंस रूमची नावं छान आहेत सायेंस वर आधारित. माझ्या मागे एक “क्वार्क” नावाची रूम आहे. ते वाचुन सगळे कॉलेजचे दिवस आठवले. क्वांटम मेकेनिक्स तेव्हा नवीन होतं पण सगळ्यात लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे त्यानी सृष्टीमधे र्र्यांडोमनेस (randomness) आणला.

सायेंस मध्ये सगळं materialistic असतं म्हणजे ग्रह, तारे, दगड, पाणी, झाड, प्राणी एव्हढच काय तर माणुस पण निव्वळ एक बायोचेमिकल मशीन म्हणुनच समजतात. सायेंसच्या मते सगळं कार्यकारणभावा प्रमाणेच घडू शकत. म्हणजे मी हॉटेल मध्ये मारे खुप विचार करून मसाला डोसा ची ओर्डर दिली तरी सायेंस म्हणतं कि माझ्या मेंदुच्या पेशी अशा फायर करत होत्या म्हणुन मी ती ओर्डर दिली. आणि मेंदुला असं करण्यावाचुन पर्याय नव्हता कारण माझ्या आवडी, वातावरण, परिस्थिती etc मुळे तसं आहे. प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे अन त्या कारणाला कारण आहे अशी ती chain आहे. म्हणजे सृष्टी उत्पन्न झाली तेव्हाच भविष्यात पुढे कायकाय होणार ते ठरून गेलं.
    

म्हणुन क्वांटम मेकेनिक्स इंटरेस्टिंग वाटतं. निदान तिथे randomness आहे. म्हणजे माणसाला स्वतःच्या मनानी एक चौईस घेता येतो. नाहीतर एव्हढा माणसाचा जन्म घेऊन जे अगोदरच ठरून गेलं आहे ते जगण्यात काय फायदा? त्यावरून आठवलं, मला वाटतं अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांना अजुन हे थोडं समजायचं आहे. अजुनही त्यांचा भर ज्योतिष्य हे शास्त्र नाही कारण सुर्य ग्रह नसून तारा आहे, चंद्र उपग्रह आहे, राहू/केतू काही ग्रह नाहीत वगैरे वगैरे वर आहे. पण त्याचा काही सम्बन्ध नाही. ज्योतिष्य हे काही शास्त्र नाही हे मला पटतं पण ज्योतिषविद्यानुसार या सगळ्यांचा आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी नेण्याचा ग्रह असतो म्हणुन त्यांना ग्रह म्हणतात. माझ्या कल्पनेप्रमाणे भविष्य सांगणे म्हणजे पुढे काय आहे याची कल्पना देणे. म्हणजे तुम्ही गाडी चालवत असाल तर जस पुढे खड्डा आहे कि पाणी साचले आहे की रस्ता वाहुन गेला आहे हे अगोदर माहित असलं तर त्याचा फायदा करून घेता येतो. तसंच भविष्याचं पण. अखेर त्या वेळी आपण कसं वागणार हे कुणीच सांगू शकत नाही कारण ते आपणच आपल्या free will नी ठरवत असतो. Minority Report सिनेमा सारखं. पण असं भवितव्य सांगता येतं का कुणी सांगावं. माझ्या या नोकरी मिळण्या बद्दल मात्र ते अगदी अचुक होतं एव्हढ मात्र खरं!

Friday, December 4, 2015

MBA इंटरव्यु

आज MBA एडमीशनचा इंटरव्यु झाला. ते करायचं राहून गेलं होतं पण उशिरा का होईना आता काळही आला अन वेळही आली असं दिसतंय. गेल्या पाच वर्षात मी दहा तरी कोर्सेस केलेत त्यामुळे नोकरी सांभाळून कसं शिकायचं ते मला चांगलं अवगत आहे. त्यावर एक प्रश्न होता, अन मला वाटतं तो मी बऱ्यापैकी हाताळला. त्याबद्दल मला माझ्या आईचं कौतुक वाटत  अन अभिमान आहे. तिचा जन्म मध्य प्रदेश मध्ये कुठल्याशा गावात झाला. तिथे तिचं चवथी पर्यंत शिक्षण झालं अन मग लग्न अन आम्ही पाच मुलं. माझी बहिण ग्र्याजुएट झाल्यावर आइनी तिच्या चाळीशीत मेंट्रिक करायचं ठरवलं! त्यात इंग्रजी, गणित सगळं सगळं एव्हढ्या वर्षानंतर करायचं म्हणजे केव्हढी जिद्द हवी. त्यात ती नापासही झाली पण प्रयत्न चालुच ठेवले, अन झाली नंतर मेंट्रिक पास! माझ्या वडिलांनी पण तिला प्रोत्साहन दिलं अन थोडीफार मदत केली पण ज्याचं त्यालाच करावं लागतं. तेव्हा मी दहा वर्षाचा असे पण मलाही त्यात उत्सुकता होती कि काय निकाल लागतो अन पुढे काय होईल त्याचा. खरं तर मेंट्रिक होऊन तिला काही नोकरी करायची नव्हती अन प्रमोशनही नाही. म्हणजे तसा स्कोपंच नव्हता, आमच्या पाच भावंडांच करण हाच फुलटाइम जॉब होता. पण मनात असेल ते उशिरा का होईना पण करायचं असा आदर्श तिने ठेवला अन अजुनही तिचा तोच बाका आहे. त्यासमोर हे नोकरी करून MBA करयचं म्हणजे किस झाडकी पत्ती.     

दुसरा प्रश्न रेझुमेत काय नाहीय्ये यावर होता. तोच मला तीन आठवड्यापूर्वी जॉब इंटरव्यु करता विचारला म्हणजे हा खूप पॉपुलर प्रश्न दिसतो. पण त्या लांब दाढीवाल्यानी तर मला त्या नोकरी करता नकार दिला होता. तरी मी तेच उत्तर दिलं कि माझे असे छंद आहेत वगैरे.

एक मात्र इंटरव्यु घेणार्यांनी बरोबर सांगितलं. MBA का करायचंय अन आमच्या कॉलेज मधूनच का असा तो प्रश्न होता. त्याचं मी सर्वसाधारण उत्तर दिलं की माझं असं असं स्वप्न आहे अन त्यातला महत्वाचा एक टप्पा म्हणजे MBAत शिकलेले स्किल्स वगैरे वगैरे. त्यावर त्यांची कोपरखळी होती कि हे शिकल्यावर तुमचे विचारंच बदलतात त्यामुळे तुमचे स्वप्न पण बदलतील अन उद्दिष्ट पण. ते खरं आहे. आपले विचार साधारणपणे खूप लिनियर असतात कि हे करू मग ते करू मग आणखी काही. पण “हे” अन “ते” करण्याचे अनुभव कधी कधी स्वतःला बदलुन टाकणारे असतात. पण ते अनुभव घेतल्याशिवाय त्याची जाणीव होत नाही. उदाहरणर्थ अमेरिकेतील Baby M ची केस. त्यात एका बाईनी सरोगेट मदर म्हणून पैशाकरता दुसऱ्याचं मुल स्वतःच्या पोटात वाढवण्याचं मान्य केलं अन तसा करारही केला. पण जन्म दिल्यावर तिचा विचार बदलला अन तिनी मुलगी त्यांना द्यायचं नाकारलं अन कोर्टात केस झाली. खर तर एव्हढा लेखी करार होता पण सुप्रीम कोर्टाचं मत होतं कि आई झाल्याशिवाय कोणत्याच बाईला आईपण काय असतं ते कळण अशक्य आहे अन तो करार त्यांनी व्होईड केला. MBAचा काही याच्याशी सम्बन्ध नाही पण काही अनुभव असे ट्रान्सफोर्मेटीव असतात म्हणुन उगीच आपण पुर्वी  ठरवलं होतं म्हणुन गोष्टी करण्यापेक्षा हे आता करण्यात काही अर्थ आहे का ते नेहेमी बघत राहायला हवं. लहानपणापासुन ध्येय वगैरे ठरवण्यात काही अर्थ नाही.

पण  इंटरव्यु तर झाला. येत्या आठवड्यात कळेल काय निकाल लागतो ते.

Tuesday, December 1, 2015

लग्नाची भानगड?

बायको माहेरी गेल्यामुळे घर कसं शांत आहे.  अर्थात ते नेहेमीच तसं असावं असं नाही.  नुकतंच लग्न झाल्यावर बायको माहेरी गेली कि खूप साचलेली कामं असतात ती करायला हुरूप येतो.  आता एव्हढ्या वर्षांच्या संसारानंतर मात्र माझं जग जवळ जवळ बायको अन कामापर्यंत मर्यादित आहे म्हणुन खूप चुकचुकल्या सारखं वाटत यवढंच.  त्यातली एक गोष्ट चांगली कि ती नसल्यामुळे सतत ओळखीच्या लोकांच्या घटस्फोटाच्या बातम्या कानी येत नाही, नाहीतर रोजंच ती असं काही सांगायची. आणि हे घटस्फोट घेणारे काही नुकते लग्न झालेले नाहीत.  त्यांची लग्न होऊन पंचवीसएक वर्ष झालीत.  असे असंख्य आहेत. म्हणजे पूर्वीच ठरवलं तरी मुलं मोठी होवून कॉलेज मधे जाईपर्यन्त वाट बघणारी.  त्याचं वाईट वाटतं अन नवलही.  एवढ्या वर्षात कसं पटवुन घेत नाहीत?

लहानपणी मी पेपर मध्ये जाहिराती वाचायचो. “तू माझ्या लग्नाची पत्नी असून माझ्या नकळत अमके हजार रुपये अन दागिने घेवून माहेरी गेलीस.  मी घ्यायला आलो तरी मला अपमानित करून परत पाठवलं.  तेव्हा तू अमके हजार रुपये घेवून सात दिवसात परत आली नाहीस तर हीच सोडचिठ्ठी समजावी”.  एंड ऑफ स्टोरी.  पैसे अन दागिने नेल्याचे आरोप अर्थातच खोटे असतात अन तिच्याजवळ तेव्हढे पैसेही नसतात.  पण आज जे मी एकतो ते घटस्फोट पैशांपायी नसतात. त्यांची कारणे म्हणजे व्यसन, मारझोड, वैचारिक मतभेद अन प्रेम प्रकरणं वगैरे. म्हणजे हजारो वर्षापासुन जी कारणे होती तीच.  नाही म्हणायला ग्वेनेथ पाल्ट्रो चा एक नवीनच सूर आहे, काय तर म्हणे “कॉन्शस अन-कपलिंग”. आजकाल काय तर म्हणे माणसं पूर्वी पेक्षा खूप वर्ष जगतात, अन एवढे वर्ष एकाच जणाबरोबर राहणे तिला पटत नाही;  पूर्वी आयुष्यमान कमी असल्यामुळे लोकं जेमतेम वीस वर्षं सुखी संसार करु शकत होते, तिला याच आयुष्यात एकापाठोपाठ एक असे वीस-वीस वर्षांचे तीन सुखी संसार करायचे आहेत. वॉव.

घटस्फोट ही क्रीस्चन पद्धत आहे, आणि हिंदु लॉ मध्ये तसं असलं तरी हिंदु धर्मात तसं काही नाही.  लग्न हा एक संस्कार आहे आणि हिदु लग्नं तर सात जन्माची असतात.  तसा पर्याय मी स्वतः कडे ठेवत नसल्यामुळे मला वाटत मी कुणाही बरोबर आयुष्यभर संसार केला असता.  पण कुणाबरोबर जगु शकलो असतो पेक्षा कुणाशिवाय जगण्याला अर्थ नाही हे शोधून काढायचं, एकनिष्ठतेनी राहण्याची शपथ घ्यायची आणि ती पाळायची हे लग्नाचं महत्व अन म्हणुन येव्हढा खटाटोप.  

पण आता समाजाचे विचारही बदललेत, आयुष्याकढे बघण्याचा दृष्टीकोण पण बदलला, जुळवून घ्यायला मदत करणारी मोठी फेमेलीपण राहिली नाही अन डीवोर्सी म्हणून काही स्टिग्मा असा नसतो (तो नसावाच).  मदतीला काऊन्सेलिंग आहे.  वर राधा अन घनश्याम चं उदाहरण आहे कन्वीनिएन्स मेऱेज म्हणुन.   हळु हळु असे जन्मभराचे लग्न करण्याचे विचार बुर्सटपणाचे ठरवले जातील अन पुढे बहुतेक हि लग्नाची संस्थाच कोसळेल अन वेगळंच काहीतरी येईल.  सगळेच बदल चांगले असतात का?

सो सॅड.  

Saturday, November 28, 2015

नमो नमः

मागे काही महिन्यापुर्वी मला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्याचा योग आला आणि मी ते ऐकून निश्चितच प्रभावित झालो होतो. भारतात मोठ्याप्रमाणात एका पाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे घोटाळे होत असतात आणि इतिहासात कुठलाच देश त्यातुन बाहेर पडू शकला नाही. म्हणजे अगदी रोमन आणि ग्रीक सभ्यता देखील त्यामुळेच ढासळल्या. त्यामुळे भारताचही भवितव्य तसं गडबडीचं वाटत होतं. पण मोदींचं भाषण ऐकून आशा बळावली. त्यांनी दिलेली उदाहरणं खूप ऑपेरेशनल स्वरुपाची होती. जसं आधारकार्ड वापरून सरळ कन्स्यूमरलाच बँकेत सबसिडी देणे, किंवा युरियाला कडुलिंबाची ट्रीटमेन्ट देणे जेणेकरून त्याचा उपयोग केवळ शेतकऱ्यासाठी खत म्हणून करता येईल असे. ऑटोमेशन अन प्रोसेस इमप्रूवमेंटनि कदाचित पहिल्यांदाच जगात भ्रस्ताचारावर आळा घालता येईल आणि त्यात ते आणि भारत यशस्वी होवो हीच प्रार्थना.

पण मास कम्युनिकेशन मध्ये हे प्रशासन कमी पडतंय असं दिसतं. गेल्या काही आठवड्यात अनेक साहित्यिकांनी त्यांचे पुरस्कार परत केले. भारतात असहिष्णुता वाढत चालली आहे, आणि त्याचे मूळ हिंदुत्वप्रधान भारतीय जनता पार्टी सत्तेवर येणे हे आहे असं त्याचं मत आहे. मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असेल अन वर तो राज्यपुरस्कृत वाटत असेल तर त्याविरुद्ध प्रतिसाद म्हणून साहित्यिकांनी पुढाकार घ्यायला हवा हे मला पटतं. पण नेमकं याच वेळेस त्यांनी अशी पावले उचलावीत हे थोडं दुर्दैवी वाटतं. मोदी सत्तेवर येण्याआधीही दाभोळकरांसारखे विचारवंत कार्यकर्त्यांचे खून झालेत. तेव्हा असहिष्णुता वाढत चालली आहे वा नाही ते समजून घ्यावे लागेल. या पूर्वी असे असंख्य अन्याय झालेत तेव्हा हे साहित्यिक का शांत होते ते देखील बघावे लागेल. मोदीजींनी पूर्वी साहित्यिकांना दिल्या गेलेल्या सवलती बंद केल्या त्याचा या पुरस्कार परत करण्याच्या चळवळीशी काही सम्बन्ध आहे की नाही हे ही पडताळून बघावे लागेल. पण पुरस्कार परत करणे हा निषेध व्यक्त करण्याचा शांततापूर्वक मार्ग आहे. म्हणून तो त्यांचा निर्णय दुर्दैवी असला तरी मान्य करून साहित्यिकांचा आदरपूर्वक सम्मानहि करायला हवा.

प्रश्न उरतो मोदीजींच्या प्रशासनाचा. पहिली गोष्ट म्हणजे भारतातल्या असंख्य लोकांना बिजेपी ची सत्ता नको होती. मोदिजींचीतर त्याहूनही नकोच. पण आता ते निवडुन आले अन पंतप्रधान झाले ते काही या गटांच्या लोकांना अजूनही पचवता आलं नाही. कधीच येणार नाही. त्यात वर मोदिजींना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यात खचितच अन लवकरच यश मिळालं. तेव्हा व्यक्तीशः त्यांच्याविषयी कुठलाही विरोध करायला वाव नाही म्हणून असे पेर्सेप्शन बेस्ड स्टंट हे एकमेव शास्त्र विरोधाकांकडे शिल्लक आहे. कारण कुणी म्हटलं कि आम्हाला “भारतात आता सुरक्षित वाटत नाही” तर ते सुरक्षित असले तरी त्यांनी व्यक्त केलेली भीती खरीच असते अन त्याकडे दुर्लक्ष करण्या पेक्षा त्यांची भीती घालवण्याचे प्रयत्न करणं अन करत असलेलं दिसणे महत्वाचं आहे.  तेव्हा अशा गटांबद्दल हे प्रशासन सतर्क राहील आणि योग्य ती पावले उचलतील अशी मी आशा करतो. दाद्रीसारख्या प्रसंगात शांत नं बसता, किंवा त्या राज्यात आमची सत्ता नाही असं नं म्हणता मॉबच्या असल्या वागणुकीचा धिक्कार करून त्याला आळा घाणण्याची योजना आखायला हवी. तसंच मोदीजी जिंकले म्हणजे जणू कायदा आपल्या खिशात आहे असा गैरसमज करून घेणाऱ्या बीजेपी सामार्थाकांवरही जरा नियंत्रण ठेवायला हवे. मोदीजींचा मला अभिमान वाटतो आणि त्यांना देश बुलंद करता येवो हीच प्रार्थना!

Wednesday, November 18, 2015

काम फत्ते

नोकरीचं तर काम फत्ते झालं. सात डिसेंबरला सुरवात होईल म्हणजे अजून अवकाश आहे.

नवीन ग्रुपमधे सामिल व्हायचं म्हणजे थोडं कुतुहूल, थोडी उत्सुकता अन थोडी काळजी वाटते.  नाही म्हंटल तरी कुणीही नवीन आलं कि सगळा ग्रुप डिस्टर्ब होतो. ब्रूस टक्मनची एक टीम डायनामिक्सची थेरी आहे. त्यामते डेवेलोप्मेंटचे चार टप्पे असतात. फोर्मिंग, स्टोर्मिंग, नोर्मिंग आणि पेर्फोर्मिंग. कुणी नवीन आलं कि हे परत एकदा होतं. 

माझ्या बहिणीला सांगितलं कि लग्नातही असंच होतं तर तिला खूप गम्मत वाटली. ग्रुप म्हणजे काही अगदी शंभर जण हवे असं काही नाही. लग्नात दोघांचाच ग्रुप. पण लग्न झालं तेव्हा ते जोडपं फोर्मिंग मध्ये असतं. तेव्हा ते तसे स्वतःतच गुंतले असतात. तुझं तू, माझं मी. पण ते काही फार काळ टिकत नाही. कारण एकत्र राहणार, आणि ते पण आपल्या जोडीदाराबद्दल च्या अपेक्षा अन कल्पना घेऊन म्हणजे कुठे तरी, काही तरी, केव्हा तरी बिनसतच! मग तू असंच का नाही केलं, तू माझा विचार का नाही केला वगैरे वगैरे वरून थोडी गडबड होते. पण प्रेमही असतं म्हणुन तडजोडी होतात, काही मर्यादा आखल्या जातात; म्हणजेच नोर्मिंग. एकदा का ते झालं कि झालं पेर्फोर्मिंग. मग सगळं सुरळीत होतं, सगळे निर्णय योग्य पद्धतीने एकमेकांचा विचार करून केले जातात वगैरे. म्हणुन लग्न म्हंटल कि रुसवे फुगवे पण आलेच. त्याचीही वेगळीच मजा असते नाही?

तर असं आहे. ही नवी टीम जरा जास्तच एटीटयुड ची आहे असं मला होणाऱ्या बॉसनी सांगितलं. त्यांचे खायचे दात एक अन दाखवायचे वेगळे. असतात अशाही टीम्स. बघू काय घडतं ते, सात डिसेंबरला अजून अवकाश आहे.

Sunday, November 15, 2015

रविवारची संध्याकाळ

रविवारची संध्याकाळ तशी खिन्न करणारी असते. कारण त्यात येणाऱ्या सोमवारची चाहूल असते. सोमवार म्हणजे वर्क-डे. अर्थात आज तसं काही नाही कारण सध्या नोकरीच्या शोधात आहे. मागच्या तीन महिन्यात येव्हढ मात्र जाणवलं कि एक विक-एन्ड म्हणजे खूप मोठा असतो. त्यात कायकाय आवडीचं करू शकतो. माझ्या नोकरीच्या तडाख्यात ते जाणवलंच नाही कारण काही न काही काम असायचंच आणि वर ग्लोबल टीम असली की रविवार संध्याकाळ पासूनच मिटींग्स चालू होऊन जातात. त्यामुळे हा ब्रेक खूप ताजातवाना करणारा होता.

दिवाळीत नोकरी मिळेल असं जे भविष्य होतं ते खरंच ठरतंय. तसे माझे दोन तीन इंटरव्युस झाले ते फोल ठरले. एक इंटरव्यू ट्रेनिंग मेनेजर बरोबर होता. त्यांनी दोनचार प्रश्न विचारली त्याची उत्तरं दिली. पण मी काय विचारावं ते कळेना. माझा  ट्रेनिंग मेनेजरशी फारसा काही सम्बन्ध येत नाही. उगीच काही विचारलं आणि झालं, दहा मिनिट अगोदरच इंटरव्यू संपला. त्यामुळे तिथे काही व्हायचं नाही ते कळलंच होतं. दुसरा इंटरव्यू घेणारा एक भयंकर मोठी दाढी वाला होता. त्याला सतत जांभया येत होत्या, तरी त्यांनी सांगितलं की रात्री झोप नं झाल्यानी जांभया देतोय. रेझ्युमे मध्ये काय नाहीय त्याबद्दल बोलू असं म्हणाला म्हणजे मी आजवर जे काय केलंय त्याचा काही उपयोग नाही अशी त्यांची कल्पना असावी. मग असंच माझे छंद वगैरे वर बोललो. पण तोही शेवटी रिजेक्ट झाला.

परवा मात्र एक संधी अचानक चालून आली त्यामुळे आशेचा नवा अंकुर फुटलाय. त्यांनी काही फार प्रश्न विचारले नाही. पूर्वीच्या मेनेजरशी थोडी बातचीत केली आणि ऑफर द्यायचं ठरवलं. “तुझं शिक्षण आणि रेझुमे बघुन निव्वळ विश्वासानी  काम देतोय” येव्हढ म्हणाले, झालं. कदाचित या आठवड्यात ऑफर येईल. कशी गम्मत असते! या जागेकरता असंख्य लोकांनी मेहेनत करून तयारी केली असेल, पण शेवटी ज्याच्या नशिबात असेल त्याला ती नोकरी मिळते.

माझं असं सततच होतं त्यामुळे मला आता सवय झाली आहे. माझं नशीब अगदी तुटेपर्यंत ताणतं पण शेवट गोड होतो. गेली तीनचार वर्षं तर हे अगदी राशी भविष्यात लिहिलंय तसं घडतंय. अगस्ट मधे नोकरी जाणार असं भविष्य होतं, गेली! दिवाळीत चांगली नोकरी मिळेल असं होतं, तर मिळतेय! भविष्य म्हणजे अंधश्रद्धा, पण माझ्या बाबतीत खरंच ठरतंय म्हणजे नक्कीच मला स्वतःच त्याचा अभ्यास करायला हवा. खूप काही मी अंधश्रद्धाळू नसलो तरी काही बाबतीत आहे, आणि काही तर मला खूप आवडतात. जसं दृष्ट काढणे! खरंच काही अशी येणाऱ्या जाणार्याची अन कुत्र्या मांजराची दृष्ट लागते असा माझा समज नसला तरी आपल्या आवडत्या व्यक्तीचं काही खूप छान होतंय, भरभराट होतेय ते कुणाच्या नजरेत भरू नये, ते तसाच राहावं आणि आणखी चांगलं व्हावं म्हणून प्रेमानी आणि काही वेळ किंवा खर्च नं करता साध्या घरगुती लिंबू मिरची सारख्या गोष्टीनी दृष्टं काढावी ही खूप डाउनराईट सेक्सी कल्पना किंवा प्रथा आहे. मला तर खूप आवडते आणि किंबहूना त्याचा मला अभिमान वाटतो आणि अशाच प्रकारच्या गोष्टींमुळे जगण्याला अर्थ लाभतो असंही वाटून जातो. काही अंधश्रद्धा प्रमोट करायला हव्यात पण बहूतांश बरखास्त करायला हव्या.

अंधश्रद्धा असो वा नसो, नोकरीचे जबरदस्त योग दिसताहेत, ते ही जरा खासंच कामाचे, तर बघू येणाऱ्या आठवड्यात काय घडतंय ते!