Saturday, November 28, 2015

नमो नमः

मागे काही महिन्यापुर्वी मला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्याचा योग आला आणि मी ते ऐकून निश्चितच प्रभावित झालो होतो. भारतात मोठ्याप्रमाणात एका पाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे घोटाळे होत असतात आणि इतिहासात कुठलाच देश त्यातुन बाहेर पडू शकला नाही. म्हणजे अगदी रोमन आणि ग्रीक सभ्यता देखील त्यामुळेच ढासळल्या. त्यामुळे भारताचही भवितव्य तसं गडबडीचं वाटत होतं. पण मोदींचं भाषण ऐकून आशा बळावली. त्यांनी दिलेली उदाहरणं खूप ऑपेरेशनल स्वरुपाची होती. जसं आधारकार्ड वापरून सरळ कन्स्यूमरलाच बँकेत सबसिडी देणे, किंवा युरियाला कडुलिंबाची ट्रीटमेन्ट देणे जेणेकरून त्याचा उपयोग केवळ शेतकऱ्यासाठी खत म्हणून करता येईल असे. ऑटोमेशन अन प्रोसेस इमप्रूवमेंटनि कदाचित पहिल्यांदाच जगात भ्रस्ताचारावर आळा घालता येईल आणि त्यात ते आणि भारत यशस्वी होवो हीच प्रार्थना.

पण मास कम्युनिकेशन मध्ये हे प्रशासन कमी पडतंय असं दिसतं. गेल्या काही आठवड्यात अनेक साहित्यिकांनी त्यांचे पुरस्कार परत केले. भारतात असहिष्णुता वाढत चालली आहे, आणि त्याचे मूळ हिंदुत्वप्रधान भारतीय जनता पार्टी सत्तेवर येणे हे आहे असं त्याचं मत आहे. मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असेल अन वर तो राज्यपुरस्कृत वाटत असेल तर त्याविरुद्ध प्रतिसाद म्हणून साहित्यिकांनी पुढाकार घ्यायला हवा हे मला पटतं. पण नेमकं याच वेळेस त्यांनी अशी पावले उचलावीत हे थोडं दुर्दैवी वाटतं. मोदी सत्तेवर येण्याआधीही दाभोळकरांसारखे विचारवंत कार्यकर्त्यांचे खून झालेत. तेव्हा असहिष्णुता वाढत चालली आहे वा नाही ते समजून घ्यावे लागेल. या पूर्वी असे असंख्य अन्याय झालेत तेव्हा हे साहित्यिक का शांत होते ते देखील बघावे लागेल. मोदीजींनी पूर्वी साहित्यिकांना दिल्या गेलेल्या सवलती बंद केल्या त्याचा या पुरस्कार परत करण्याच्या चळवळीशी काही सम्बन्ध आहे की नाही हे ही पडताळून बघावे लागेल. पण पुरस्कार परत करणे हा निषेध व्यक्त करण्याचा शांततापूर्वक मार्ग आहे. म्हणून तो त्यांचा निर्णय दुर्दैवी असला तरी मान्य करून साहित्यिकांचा आदरपूर्वक सम्मानहि करायला हवा.

प्रश्न उरतो मोदीजींच्या प्रशासनाचा. पहिली गोष्ट म्हणजे भारतातल्या असंख्य लोकांना बिजेपी ची सत्ता नको होती. मोदिजींचीतर त्याहूनही नकोच. पण आता ते निवडुन आले अन पंतप्रधान झाले ते काही या गटांच्या लोकांना अजूनही पचवता आलं नाही. कधीच येणार नाही. त्यात वर मोदिजींना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यात खचितच अन लवकरच यश मिळालं. तेव्हा व्यक्तीशः त्यांच्याविषयी कुठलाही विरोध करायला वाव नाही म्हणून असे पेर्सेप्शन बेस्ड स्टंट हे एकमेव शास्त्र विरोधाकांकडे शिल्लक आहे. कारण कुणी म्हटलं कि आम्हाला “भारतात आता सुरक्षित वाटत नाही” तर ते सुरक्षित असले तरी त्यांनी व्यक्त केलेली भीती खरीच असते अन त्याकडे दुर्लक्ष करण्या पेक्षा त्यांची भीती घालवण्याचे प्रयत्न करणं अन करत असलेलं दिसणे महत्वाचं आहे.  तेव्हा अशा गटांबद्दल हे प्रशासन सतर्क राहील आणि योग्य ती पावले उचलतील अशी मी आशा करतो. दाद्रीसारख्या प्रसंगात शांत नं बसता, किंवा त्या राज्यात आमची सत्ता नाही असं नं म्हणता मॉबच्या असल्या वागणुकीचा धिक्कार करून त्याला आळा घाणण्याची योजना आखायला हवी. तसंच मोदीजी जिंकले म्हणजे जणू कायदा आपल्या खिशात आहे असा गैरसमज करून घेणाऱ्या बीजेपी सामार्थाकांवरही जरा नियंत्रण ठेवायला हवे. मोदीजींचा मला अभिमान वाटतो आणि त्यांना देश बुलंद करता येवो हीच प्रार्थना!

Wednesday, November 18, 2015

काम फत्ते

नोकरीचं तर काम फत्ते झालं. सात डिसेंबरला सुरवात होईल म्हणजे अजून अवकाश आहे.

नवीन ग्रुपमधे सामिल व्हायचं म्हणजे थोडं कुतुहूल, थोडी उत्सुकता अन थोडी काळजी वाटते.  नाही म्हंटल तरी कुणीही नवीन आलं कि सगळा ग्रुप डिस्टर्ब होतो. ब्रूस टक्मनची एक टीम डायनामिक्सची थेरी आहे. त्यामते डेवेलोप्मेंटचे चार टप्पे असतात. फोर्मिंग, स्टोर्मिंग, नोर्मिंग आणि पेर्फोर्मिंग. कुणी नवीन आलं कि हे परत एकदा होतं. 

माझ्या बहिणीला सांगितलं कि लग्नातही असंच होतं तर तिला खूप गम्मत वाटली. ग्रुप म्हणजे काही अगदी शंभर जण हवे असं काही नाही. लग्नात दोघांचाच ग्रुप. पण लग्न झालं तेव्हा ते जोडपं फोर्मिंग मध्ये असतं. तेव्हा ते तसे स्वतःतच गुंतले असतात. तुझं तू, माझं मी. पण ते काही फार काळ टिकत नाही. कारण एकत्र राहणार, आणि ते पण आपल्या जोडीदाराबद्दल च्या अपेक्षा अन कल्पना घेऊन म्हणजे कुठे तरी, काही तरी, केव्हा तरी बिनसतच! मग तू असंच का नाही केलं, तू माझा विचार का नाही केला वगैरे वगैरे वरून थोडी गडबड होते. पण प्रेमही असतं म्हणुन तडजोडी होतात, काही मर्यादा आखल्या जातात; म्हणजेच नोर्मिंग. एकदा का ते झालं कि झालं पेर्फोर्मिंग. मग सगळं सुरळीत होतं, सगळे निर्णय योग्य पद्धतीने एकमेकांचा विचार करून केले जातात वगैरे. म्हणुन लग्न म्हंटल कि रुसवे फुगवे पण आलेच. त्याचीही वेगळीच मजा असते नाही?

तर असं आहे. ही नवी टीम जरा जास्तच एटीटयुड ची आहे असं मला होणाऱ्या बॉसनी सांगितलं. त्यांचे खायचे दात एक अन दाखवायचे वेगळे. असतात अशाही टीम्स. बघू काय घडतं ते, सात डिसेंबरला अजून अवकाश आहे.

Sunday, November 15, 2015

रविवारची संध्याकाळ

रविवारची संध्याकाळ तशी खिन्न करणारी असते. कारण त्यात येणाऱ्या सोमवारची चाहूल असते. सोमवार म्हणजे वर्क-डे. अर्थात आज तसं काही नाही कारण सध्या नोकरीच्या शोधात आहे. मागच्या तीन महिन्यात येव्हढ मात्र जाणवलं कि एक विक-एन्ड म्हणजे खूप मोठा असतो. त्यात कायकाय आवडीचं करू शकतो. माझ्या नोकरीच्या तडाख्यात ते जाणवलंच नाही कारण काही न काही काम असायचंच आणि वर ग्लोबल टीम असली की रविवार संध्याकाळ पासूनच मिटींग्स चालू होऊन जातात. त्यामुळे हा ब्रेक खूप ताजातवाना करणारा होता.

दिवाळीत नोकरी मिळेल असं जे भविष्य होतं ते खरंच ठरतंय. तसे माझे दोन तीन इंटरव्युस झाले ते फोल ठरले. एक इंटरव्यू ट्रेनिंग मेनेजर बरोबर होता. त्यांनी दोनचार प्रश्न विचारली त्याची उत्तरं दिली. पण मी काय विचारावं ते कळेना. माझा  ट्रेनिंग मेनेजरशी फारसा काही सम्बन्ध येत नाही. उगीच काही विचारलं आणि झालं, दहा मिनिट अगोदरच इंटरव्यू संपला. त्यामुळे तिथे काही व्हायचं नाही ते कळलंच होतं. दुसरा इंटरव्यू घेणारा एक भयंकर मोठी दाढी वाला होता. त्याला सतत जांभया येत होत्या, तरी त्यांनी सांगितलं की रात्री झोप नं झाल्यानी जांभया देतोय. रेझ्युमे मध्ये काय नाहीय त्याबद्दल बोलू असं म्हणाला म्हणजे मी आजवर जे काय केलंय त्याचा काही उपयोग नाही अशी त्यांची कल्पना असावी. मग असंच माझे छंद वगैरे वर बोललो. पण तोही शेवटी रिजेक्ट झाला.

परवा मात्र एक संधी अचानक चालून आली त्यामुळे आशेचा नवा अंकुर फुटलाय. त्यांनी काही फार प्रश्न विचारले नाही. पूर्वीच्या मेनेजरशी थोडी बातचीत केली आणि ऑफर द्यायचं ठरवलं. “तुझं शिक्षण आणि रेझुमे बघुन निव्वळ विश्वासानी  काम देतोय” येव्हढ म्हणाले, झालं. कदाचित या आठवड्यात ऑफर येईल. कशी गम्मत असते! या जागेकरता असंख्य लोकांनी मेहेनत करून तयारी केली असेल, पण शेवटी ज्याच्या नशिबात असेल त्याला ती नोकरी मिळते.

माझं असं सततच होतं त्यामुळे मला आता सवय झाली आहे. माझं नशीब अगदी तुटेपर्यंत ताणतं पण शेवट गोड होतो. गेली तीनचार वर्षं तर हे अगदी राशी भविष्यात लिहिलंय तसं घडतंय. अगस्ट मधे नोकरी जाणार असं भविष्य होतं, गेली! दिवाळीत चांगली नोकरी मिळेल असं होतं, तर मिळतेय! भविष्य म्हणजे अंधश्रद्धा, पण माझ्या बाबतीत खरंच ठरतंय म्हणजे नक्कीच मला स्वतःच त्याचा अभ्यास करायला हवा. खूप काही मी अंधश्रद्धाळू नसलो तरी काही बाबतीत आहे, आणि काही तर मला खूप आवडतात. जसं दृष्ट काढणे! खरंच काही अशी येणाऱ्या जाणार्याची अन कुत्र्या मांजराची दृष्ट लागते असा माझा समज नसला तरी आपल्या आवडत्या व्यक्तीचं काही खूप छान होतंय, भरभराट होतेय ते कुणाच्या नजरेत भरू नये, ते तसाच राहावं आणि आणखी चांगलं व्हावं म्हणून प्रेमानी आणि काही वेळ किंवा खर्च नं करता साध्या घरगुती लिंबू मिरची सारख्या गोष्टीनी दृष्टं काढावी ही खूप डाउनराईट सेक्सी कल्पना किंवा प्रथा आहे. मला तर खूप आवडते आणि किंबहूना त्याचा मला अभिमान वाटतो आणि अशाच प्रकारच्या गोष्टींमुळे जगण्याला अर्थ लाभतो असंही वाटून जातो. काही अंधश्रद्धा प्रमोट करायला हव्यात पण बहूतांश बरखास्त करायला हव्या.

अंधश्रद्धा असो वा नसो, नोकरीचे जबरदस्त योग दिसताहेत, ते ही जरा खासंच कामाचे, तर बघू येणाऱ्या आठवड्यात काय घडतंय ते!

Tuesday, November 10, 2015

दिवाळी 2015


मंडळी, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Thursday, November 5, 2015

असंच काही बाही

मी दिवाळी ची खूप आतुरतेनी वाट बघतो आहे कारण मला वाटत तेव्हा पर्यंत नोकरी मिळून जाईल. आज काही इंटरव्युस दिले ते झकास झाले.

खरं तर नोकरीचा मला फार कंटाळा आला आहे. पण काय करणार. माझा प्रान्त प्रोजेक्ट मेनेजरचा. त्यात काही फारसं आवडण्यासारखं काही नाही. पण ऐप्पल, गुगल, फेसबुक, अमेझोन, टेसला, ऊबर सारख्या कंपन्यामधे मजा येईल. यांचे प्रोडक्ट्स बघून मन थक्कच होतं.  नाही म्हटलं तरी या नोकरीच्या शोधाने त्याचा अभ्यास करता आला.  सध्या तरी माझ्या डोक्यात तेच घोळतंय, म्हणुन तेच लिहितो.

ऐप्पल खासंच आहे. आयफोन, आयपॅड, म्याकबुक, वाच, आणी टीवी व्यतिरिक्त त्यांची स्वयंचलित कार पण येणार आहे. अर्थात ती फक्तं बघण्याकरता, मला नाही वाटत ती परवडण्या सारखी राहील.   

गुगल ही कम्पनी आता गुगल राहिली नाही, ती अल्फाबेट झालीये. या अल्फाबेट कम्पनीमधे इंग्रजीतल्या ए टू झी अशा प्रत्येक अक्षरापासून एक स्वतंत्र कंपनी राहील. त्यापैकी जी म्हणजे गुगल.  अल्फाबेट चा एकुण पोर्टफोलॆऒ असा:

१- गुगल - अल्फाबेटचे ९० टक्के पेक्षा जास्त इंजीनीर्स इथे काम करतात. पण सर्च इंजिन व्यतिरिच्क्त यांचे बरेच प्रोडक्ट्स आहेत. ते म्हणजे युट्युब, म्याप्स, गुगल प्ले, एण्डरोईड, जी-मेल आणी कॅलेन्डर, गुगल ड्राईव्ह आणी क्लाऊड, नेक्सस फोन आणी टेबलेट, हे ब्लॉगर, ओन हब नावाचा रौटर, क्रोमकास्ट असं बरंच काही.

२ - नेस्ट ल्याब्स - ही म्हणजे घराचं सगळं कॉम्पुटर वर चालवण्याकरता. सध्या त्याचे प्रोडक्ट्स म्हणजे एअरकंडीशनर चा थर्मोस्टेट आणी घराच्या संरक्षणाकरता वीडीयो कॅमेरा.

३ - कॅलिको ल्याब्स - माणसाचं आयुष्य वाढवण्या साठी.

४ - गुगल लाईफ सायेन्सिस - न्यानो टेक वापरून कॅन्सर वर उपाय.

५ - ड्रोन - स्वयंचलित ड्रोन पण शेतीचे आकाशातून परीक्षण किंवा घरपोच सामानाच्या डेलीवरी करता वगैरे.  

६ - फायबर - भन्नाट स्पीड मध्ये इन्टरनेट कनेक्षन करता

७ - माकानी - पतंगी सारख्या आकाशात उडणाऱ्या पवनचक्क्या

८ - लुन - मोठे मोठे फुगे आकाशातून इन्टरनेट कनेक्षन करता. मग गावा गावात आणी खेड्यापाड्यात पण सहज गूगल वापरता येईल

९ - स्वयंचलित कार - माणसापेक्षा चांगल्या पद्धतीने चालवणारी कार म्हणजे एक्सिडेंट नाहीच   

१० - गूगल एक्स्प्रेस - अमेझोन सारखंच घरपोच सामानाच्या डेलीवरी करता  

११ - बोस्टोन डायनेमिक्स - रोबोट तयार करण्या करता.   

शोधलं तर अजुन तेव्हढेच परत मिळतील. किंबहुना जास्तंच कारण सव्वीस हवेत ना.

फेसबुक वापरत नसल्यामुळे त्याचं तेव्हढ माहित नाही, पण व्हाटसएप खूप वापरतो. त्याचं ओक्युलस रीफ्ट नावाचं भन्नाट गेमिंग प्रोडक्ट् आहे ज्यांनी मायाजाल सारखं वेगळंच विश्व तयार होतं.  फेसबुक पण ड्रोन तयार करतंय, आणी त्याचं युट्युब ला प्रतिस्पर्धी प्रोडक्ट् येतंय.
  
असं म्हणतात की कुठलही प्रोडक्ट् बाजारात यायला जवळ जवळ वीस वर्ष लागतात आणी ते खरं वाटतं.  मागच्या वीस वर्षापेक्षा पुढचे वीस निश्चितच वेगळे राहतील.

टेसला/स्पेस एक्स चे इलोन मस्क माणसाला मंगळावर नेताहेत. ते ही नुसतं बघण्याकरता नव्हे, तर वस्तीकरण्याकरता!

निदान दहा बारा तरी कंपन्या स्वयंचलित गाड्या आणताहेत, त्या पण ब्याटरी वर चालणाऱ्या. तसेच असंख्य ड्रोन येताहेत.

म्हणजे आज सिनेमात दिसणाऱ्या गोष्टी वीस वर्षांनी दैनंदिन जीवनात साधारण वाटतील. मे बी नॉट.

पण येव्हढ खरं की कुठल्या देशाच्या सरकारी खात्यापेक्षा या प्रायवेट कंपन्या खरंच दूरदृष्टी ठेवणाऱ्या आहेत. विनाकारण स्वप्न दाखवुन मोठाले टेक्स लावण्यापेक्षा या कंपन्या स्वतःच्या बळावर ही स्वप्नं खरी करायला झटताहेत. हे खरंच अविश्वसनीय आहे.

आणी एव्हढा पैसा त्यांच्याकडे येतो कसा याची कमाल वाटते. मी फुकट जी-मेल वापरलं तरी कधी गूगल च्या एडस वर क्लिक केलं नाही! त्यामुळे मला वाटतं मी तुम्हा सगळ्या क्लिक करणाऱ्यांचा ऋणी आहे कारण त्या मुळेच हे शक्य होतंय.

म्हणुन थेन्क्स!

Wednesday, November 4, 2015

या ब्लॉग च्या नावाबद्दल...

श्री गणेशाय नमः

नमस्ते वर्ल्ड!

मला "अवकाश" हा शब्द खूप आवडतो.  म्हणजे कसं की कशाची घाई नाही, अवकाश आहे!  नाहीतर सदैव धावाधाव चालू असते.  काहीतरी कसाबस केलं तेव्हढ्यात परत दुसर्याच्या मागे धावयचं.  घाईघाईत कसा वेळ जातो ते कळत पण नाही.  म्हणून "अवकाश आहे" ऐकायला कानाला खूप गोड वाटतं, मनाला निश्चिन्त वाटतं.

आणि दुसरा अर्थ म्हणजे अंतराळ, माझा आवडता विषय… तिथे काय काय आहे देव जाणे.  सतत बातम्या येत असतात की नवीन पृथ्वी सारख्या ग्रहांचे शोध लागले, आणि अंतराळाचे अप्रतिम फोटो येतात ते बघून मन थक्क होतं.  बाकी माझा आवडता प्लुटो आता ग्रह नाहीच म्हणे, ते मात्र मी अजून पचवतोच आहे.  

असो. स्पेस आणि टाइम ह्यांचा समन्वय असलेला हा शब्द मला ब्लॉग करता मिळाला याचा मला खूप आनंद झाला. निदान हा ब्लॉग तयार करायचा पहिला टप्पा तर पूर्ण झाला.  आणि सध्या नोकरीच्या शोधात असल्यामुळे वेळ भरपूर आहे. शिवाय चंद्रबळ, ताराबळ पाठीशी आहेच की.

तेव्हा मला खात्री आहे की हा उपक्रम नक्की यशस्वी होईल.

बघु, अजून अवकाश आहे…