Friday, December 4, 2015

MBA इंटरव्यु

आज MBA एडमीशनचा इंटरव्यु झाला. ते करायचं राहून गेलं होतं पण उशिरा का होईना आता काळही आला अन वेळही आली असं दिसतंय. गेल्या पाच वर्षात मी दहा तरी कोर्सेस केलेत त्यामुळे नोकरी सांभाळून कसं शिकायचं ते मला चांगलं अवगत आहे. त्यावर एक प्रश्न होता, अन मला वाटतं तो मी बऱ्यापैकी हाताळला. त्याबद्दल मला माझ्या आईचं कौतुक वाटत  अन अभिमान आहे. तिचा जन्म मध्य प्रदेश मध्ये कुठल्याशा गावात झाला. तिथे तिचं चवथी पर्यंत शिक्षण झालं अन मग लग्न अन आम्ही पाच मुलं. माझी बहिण ग्र्याजुएट झाल्यावर आइनी तिच्या चाळीशीत मेंट्रिक करायचं ठरवलं! त्यात इंग्रजी, गणित सगळं सगळं एव्हढ्या वर्षानंतर करायचं म्हणजे केव्हढी जिद्द हवी. त्यात ती नापासही झाली पण प्रयत्न चालुच ठेवले, अन झाली नंतर मेंट्रिक पास! माझ्या वडिलांनी पण तिला प्रोत्साहन दिलं अन थोडीफार मदत केली पण ज्याचं त्यालाच करावं लागतं. तेव्हा मी दहा वर्षाचा असे पण मलाही त्यात उत्सुकता होती कि काय निकाल लागतो अन पुढे काय होईल त्याचा. खरं तर मेंट्रिक होऊन तिला काही नोकरी करायची नव्हती अन प्रमोशनही नाही. म्हणजे तसा स्कोपंच नव्हता, आमच्या पाच भावंडांच करण हाच फुलटाइम जॉब होता. पण मनात असेल ते उशिरा का होईना पण करायचं असा आदर्श तिने ठेवला अन अजुनही तिचा तोच बाका आहे. त्यासमोर हे नोकरी करून MBA करयचं म्हणजे किस झाडकी पत्ती.     

दुसरा प्रश्न रेझुमेत काय नाहीय्ये यावर होता. तोच मला तीन आठवड्यापूर्वी जॉब इंटरव्यु करता विचारला म्हणजे हा खूप पॉपुलर प्रश्न दिसतो. पण त्या लांब दाढीवाल्यानी तर मला त्या नोकरी करता नकार दिला होता. तरी मी तेच उत्तर दिलं कि माझे असे छंद आहेत वगैरे.

एक मात्र इंटरव्यु घेणार्यांनी बरोबर सांगितलं. MBA का करायचंय अन आमच्या कॉलेज मधूनच का असा तो प्रश्न होता. त्याचं मी सर्वसाधारण उत्तर दिलं की माझं असं असं स्वप्न आहे अन त्यातला महत्वाचा एक टप्पा म्हणजे MBAत शिकलेले स्किल्स वगैरे वगैरे. त्यावर त्यांची कोपरखळी होती कि हे शिकल्यावर तुमचे विचारंच बदलतात त्यामुळे तुमचे स्वप्न पण बदलतील अन उद्दिष्ट पण. ते खरं आहे. आपले विचार साधारणपणे खूप लिनियर असतात कि हे करू मग ते करू मग आणखी काही. पण “हे” अन “ते” करण्याचे अनुभव कधी कधी स्वतःला बदलुन टाकणारे असतात. पण ते अनुभव घेतल्याशिवाय त्याची जाणीव होत नाही. उदाहरणर्थ अमेरिकेतील Baby M ची केस. त्यात एका बाईनी सरोगेट मदर म्हणून पैशाकरता दुसऱ्याचं मुल स्वतःच्या पोटात वाढवण्याचं मान्य केलं अन तसा करारही केला. पण जन्म दिल्यावर तिचा विचार बदलला अन तिनी मुलगी त्यांना द्यायचं नाकारलं अन कोर्टात केस झाली. खर तर एव्हढा लेखी करार होता पण सुप्रीम कोर्टाचं मत होतं कि आई झाल्याशिवाय कोणत्याच बाईला आईपण काय असतं ते कळण अशक्य आहे अन तो करार त्यांनी व्होईड केला. MBAचा काही याच्याशी सम्बन्ध नाही पण काही अनुभव असे ट्रान्सफोर्मेटीव असतात म्हणुन उगीच आपण पुर्वी  ठरवलं होतं म्हणुन गोष्टी करण्यापेक्षा हे आता करण्यात काही अर्थ आहे का ते नेहेमी बघत राहायला हवं. लहानपणापासुन ध्येय वगैरे ठरवण्यात काही अर्थ नाही.

पण  इंटरव्यु तर झाला. येत्या आठवड्यात कळेल काय निकाल लागतो ते.

No comments:

Post a Comment