Sunday, November 15, 2015

रविवारची संध्याकाळ

रविवारची संध्याकाळ तशी खिन्न करणारी असते. कारण त्यात येणाऱ्या सोमवारची चाहूल असते. सोमवार म्हणजे वर्क-डे. अर्थात आज तसं काही नाही कारण सध्या नोकरीच्या शोधात आहे. मागच्या तीन महिन्यात येव्हढ मात्र जाणवलं कि एक विक-एन्ड म्हणजे खूप मोठा असतो. त्यात कायकाय आवडीचं करू शकतो. माझ्या नोकरीच्या तडाख्यात ते जाणवलंच नाही कारण काही न काही काम असायचंच आणि वर ग्लोबल टीम असली की रविवार संध्याकाळ पासूनच मिटींग्स चालू होऊन जातात. त्यामुळे हा ब्रेक खूप ताजातवाना करणारा होता.

दिवाळीत नोकरी मिळेल असं जे भविष्य होतं ते खरंच ठरतंय. तसे माझे दोन तीन इंटरव्युस झाले ते फोल ठरले. एक इंटरव्यू ट्रेनिंग मेनेजर बरोबर होता. त्यांनी दोनचार प्रश्न विचारली त्याची उत्तरं दिली. पण मी काय विचारावं ते कळेना. माझा  ट्रेनिंग मेनेजरशी फारसा काही सम्बन्ध येत नाही. उगीच काही विचारलं आणि झालं, दहा मिनिट अगोदरच इंटरव्यू संपला. त्यामुळे तिथे काही व्हायचं नाही ते कळलंच होतं. दुसरा इंटरव्यू घेणारा एक भयंकर मोठी दाढी वाला होता. त्याला सतत जांभया येत होत्या, तरी त्यांनी सांगितलं की रात्री झोप नं झाल्यानी जांभया देतोय. रेझ्युमे मध्ये काय नाहीय त्याबद्दल बोलू असं म्हणाला म्हणजे मी आजवर जे काय केलंय त्याचा काही उपयोग नाही अशी त्यांची कल्पना असावी. मग असंच माझे छंद वगैरे वर बोललो. पण तोही शेवटी रिजेक्ट झाला.

परवा मात्र एक संधी अचानक चालून आली त्यामुळे आशेचा नवा अंकुर फुटलाय. त्यांनी काही फार प्रश्न विचारले नाही. पूर्वीच्या मेनेजरशी थोडी बातचीत केली आणि ऑफर द्यायचं ठरवलं. “तुझं शिक्षण आणि रेझुमे बघुन निव्वळ विश्वासानी  काम देतोय” येव्हढ म्हणाले, झालं. कदाचित या आठवड्यात ऑफर येईल. कशी गम्मत असते! या जागेकरता असंख्य लोकांनी मेहेनत करून तयारी केली असेल, पण शेवटी ज्याच्या नशिबात असेल त्याला ती नोकरी मिळते.

माझं असं सततच होतं त्यामुळे मला आता सवय झाली आहे. माझं नशीब अगदी तुटेपर्यंत ताणतं पण शेवट गोड होतो. गेली तीनचार वर्षं तर हे अगदी राशी भविष्यात लिहिलंय तसं घडतंय. अगस्ट मधे नोकरी जाणार असं भविष्य होतं, गेली! दिवाळीत चांगली नोकरी मिळेल असं होतं, तर मिळतेय! भविष्य म्हणजे अंधश्रद्धा, पण माझ्या बाबतीत खरंच ठरतंय म्हणजे नक्कीच मला स्वतःच त्याचा अभ्यास करायला हवा. खूप काही मी अंधश्रद्धाळू नसलो तरी काही बाबतीत आहे, आणि काही तर मला खूप आवडतात. जसं दृष्ट काढणे! खरंच काही अशी येणाऱ्या जाणार्याची अन कुत्र्या मांजराची दृष्ट लागते असा माझा समज नसला तरी आपल्या आवडत्या व्यक्तीचं काही खूप छान होतंय, भरभराट होतेय ते कुणाच्या नजरेत भरू नये, ते तसाच राहावं आणि आणखी चांगलं व्हावं म्हणून प्रेमानी आणि काही वेळ किंवा खर्च नं करता साध्या घरगुती लिंबू मिरची सारख्या गोष्टीनी दृष्टं काढावी ही खूप डाउनराईट सेक्सी कल्पना किंवा प्रथा आहे. मला तर खूप आवडते आणि किंबहूना त्याचा मला अभिमान वाटतो आणि अशाच प्रकारच्या गोष्टींमुळे जगण्याला अर्थ लाभतो असंही वाटून जातो. काही अंधश्रद्धा प्रमोट करायला हव्यात पण बहूतांश बरखास्त करायला हव्या.

अंधश्रद्धा असो वा नसो, नोकरीचे जबरदस्त योग दिसताहेत, ते ही जरा खासंच कामाचे, तर बघू येणाऱ्या आठवड्यात काय घडतंय ते!

No comments:

Post a Comment