Wednesday, November 18, 2015

काम फत्ते

नोकरीचं तर काम फत्ते झालं. सात डिसेंबरला सुरवात होईल म्हणजे अजून अवकाश आहे.

नवीन ग्रुपमधे सामिल व्हायचं म्हणजे थोडं कुतुहूल, थोडी उत्सुकता अन थोडी काळजी वाटते.  नाही म्हंटल तरी कुणीही नवीन आलं कि सगळा ग्रुप डिस्टर्ब होतो. ब्रूस टक्मनची एक टीम डायनामिक्सची थेरी आहे. त्यामते डेवेलोप्मेंटचे चार टप्पे असतात. फोर्मिंग, स्टोर्मिंग, नोर्मिंग आणि पेर्फोर्मिंग. कुणी नवीन आलं कि हे परत एकदा होतं. 

माझ्या बहिणीला सांगितलं कि लग्नातही असंच होतं तर तिला खूप गम्मत वाटली. ग्रुप म्हणजे काही अगदी शंभर जण हवे असं काही नाही. लग्नात दोघांचाच ग्रुप. पण लग्न झालं तेव्हा ते जोडपं फोर्मिंग मध्ये असतं. तेव्हा ते तसे स्वतःतच गुंतले असतात. तुझं तू, माझं मी. पण ते काही फार काळ टिकत नाही. कारण एकत्र राहणार, आणि ते पण आपल्या जोडीदाराबद्दल च्या अपेक्षा अन कल्पना घेऊन म्हणजे कुठे तरी, काही तरी, केव्हा तरी बिनसतच! मग तू असंच का नाही केलं, तू माझा विचार का नाही केला वगैरे वगैरे वरून थोडी गडबड होते. पण प्रेमही असतं म्हणुन तडजोडी होतात, काही मर्यादा आखल्या जातात; म्हणजेच नोर्मिंग. एकदा का ते झालं कि झालं पेर्फोर्मिंग. मग सगळं सुरळीत होतं, सगळे निर्णय योग्य पद्धतीने एकमेकांचा विचार करून केले जातात वगैरे. म्हणुन लग्न म्हंटल कि रुसवे फुगवे पण आलेच. त्याचीही वेगळीच मजा असते नाही?

तर असं आहे. ही नवी टीम जरा जास्तच एटीटयुड ची आहे असं मला होणाऱ्या बॉसनी सांगितलं. त्यांचे खायचे दात एक अन दाखवायचे वेगळे. असतात अशाही टीम्स. बघू काय घडतं ते, सात डिसेंबरला अजून अवकाश आहे.

No comments:

Post a Comment